|| श्री देवी भद्रकाली रेवंडीचा इतिहास ||

रेवंडीची देवी भद्रकाली हे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. देवस्थानच्या जुन्या जाणत्या व अनुभवी मानकर्यां कडून काही माहिती प्राप्त झाली आहे. त्यानुसार मंदिराची स्थापना सुमारे ४०० वर्षांपूर्वी झाली असावी, असे सांगण्यात येते. येथील रेवंडीच्या कांबळी घराण्यातील मूळ वंशज हे काशीहून आले. ते प्रथम कांदळगावच्या सीमेवरून सध्या असलेल्या कांबळीवाडी येथे वास्तव्यास आले. रेवंडी गावची मध्यवर्ती जागा निवडून तेथे श्री शंकर व पार्वती या उभयता देवतांची काळ्या पाषाणाची लिंग स्वरूपात स्थापना केली. हे अर्धनारीनटेश्वराचे एकरूप स्वरूप आहे. तसेच भद्र म्हणजे शिवशंकर व काली म्हणजेच पार्वतीमाता असल्यामुळे ही देवता ‘भद्रकाली’ या नावाने प्रसिद्ध झाली.

या पवित्र स्थानात देवीच्या आगमनासंबंधी असे सांगितले जाते की, एकदा देवी पार्वती माता भगवान शंकरावर रुष्ठ होऊन या निर्जन व निसर्गरम्य अशा मनोहर ठिकाणी येऊन राहिली. तिची समजूत काढण्यासाठी भगवान शंकर अनेक देवता व आपल्या गणांसह येथे अवतरले. माता पार्वती संतुष्ट झाल्यावर उभयतांनी आमच्या येथे कायम वास राहील व आमच्या भक्तांचे सदैव रक्षण करू, असे वरदान दिले. त्याचबरोबर आपल्या सवे आलेल्या देवता व गण यांना त्यांचे उचित स्थान निर्माण करून दिले व वर्षातून एकदा तुमच्या भेटीसाठी येईन, असे वचन दिले. देवीच्या सामर्थ्यामुळे आतापर्यंत कोणतेही अरिष्ट वा रोगराईचे संकट गावात येऊ शकले नाही.

स्वातंत्र्यपूर्व काळात रेवंडी व सर्जेकोट हे एक गाव होते. कालांतराने ते वेगवेगवेगळे झाले. देवीची बारा पांच स्थळे दोन्ही गावात स्थापन करण्यात आली आहेत ती पुढीलप्रमाणे – श्री काशीकल्याण ब्राह्मण, श्री कांबळी मूळ पुरूष, श्री जुगापती महापुरुष, श्री कुलस्वामी (आकार), श्री शारंगधर, श्री शिक्रोबा (महापुरुष), श्री खेयबा (चाळा), बाराची नीत, श्री श्री जैन ब्राह्मण, मोरया धोंडा, म्हारगीर( काठीकार), श्री क्षेत्रपाल, श्री सीमादेवी, चौकचार, हसनारो, तेलोमाखलो देव, पीर, बाबरो हसनारो देव याखेरीज बाराचा पूर्वज, पूर्वसंबंध, राठीचा देवचार, खुनी देवचार, गावडे पुरुष हे देवीच्या बाजूस गाभाऱ्यात स्थापन केलेले आहेत.

या स्थानांव्यतिरिक्त मंदिराच्या दक्षिणेकडे एक स्वयंभू पिंडी आहे. सदर पिंडी दुभंगलेली आहे हे लिंग उघड्यावर असून याचे मंदिर बांधण्यास देवाची संमती नसल्याचे मानतात. दर श्रावण सोमवारी व महाशिवरात्रीच्या दिवशी येथे दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भक्त दर्शनासाठी येतात.
मंदिराची रचना दक्षिणोत्तर आहे. देवतेची सत्याची देवता असून सत्य उघड करण्यास देवीला सहाय्य करते. गाभार्यारच्या डाव्या बाजूस अवसारी तरंग सजवलेले दिसतात. देवी समोरील चौकात पुरातन मंदिराचे चार खांब होते. या चार खांबात अवसार तत्वे वाढविली जातात. सूयेर-सुतकाच्यावेळी या चार खांबात प्रवेश करू नये असा नियम आहे. सध्या खांब नसले तरी अजूनही चार खांबांचा उल्लेख केला जातो. त्याच प्रमाणे चार खांबाबाहेर डावीकडील पूर्व भागात काठीकाराचे अवसार वाढविले जाते. देवस्थानी राठीचे प्रश्न सोडविण्यास यांची मदत घेतली जाते. मंदिराच्या मागील बाजूस खेयबा चाळा हे स्थान आहे. हा चौ-याऐंशी खेड्यांचा अधिपती मानला जातो.